CHEMOTHERAPY DIET
किमोथेरपीनंतरः काय खावे ?
आहार/रोजचे जेवण हा आपल्या जीवनाचा फार महत्वाचा भाग आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात तर खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. त्यामुळे कोणत्याही आजारात ‘काय खावे' अथवा 'काय खाऊ नये' याबद्दलचे ग्रंथ उपलब्ध आहेत. रुग्णांशी उपचाराबद्दल चर्चा करताना आहारावर खूप वेळ दिला जातो, पथ्यांवरून साधक- बाधक चर्चा केली जाते, आहाराचे तक्ते दिले जातात आणि मग सुरू होते ते आजाराचे 'डाएट'. खाण्याचे पथ्य नसेल तर उपचारात काही 'दम' नाही, किंबहुना खाण्यापिण्यावर बंधने घालत नाहीत ते डॉक्टरच काही खरे नव्हे असेही काहींचे मत आहे.
कॅन्सरसाठी किमोथेरपी सुरू असताना कोणतेही खास असे पथ्य पाळावे लागत नाही. हे वाक्य वाचून अनेकांना धक्का बसेल. कारण साध्या सर्दी-खोकल्यापासून डायबेटीस/रक्तदाब/हृदयविकारासाठी अनेक पथ्ये असताना कॅन्सरसाठी कोणतेही पथ्य नसणे अनेकांना पटतच नाही. पण हे सत्य आहे. अमुक एक पदार्थ कॅन्सर झाला असताना वर्ज्य करावा लागतो असे नाही. घरगुती साधे, हव्या त्या चवीचे, शाकाहारी किंवा मांसाहारी जेवण कॅन्सरच्या रुग्णांनी घ्यायला हरकत नाही. समतोल आहारात: कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स): तृणधान्ये (पोळी-भाकरी - भात, ब्रेड, पास्ता इ), फळे यातून मिळतात.
प्रथिने (प्रोटीन्स) : मांसाहारी पदार्थ, दूध व दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन, कडधान्ये, डाळी यातून मिळतात.
स्निग्ध पदार्थ (फॅट्स): तेल, तूप, दूध, मांसाहारातून मिळतात.
घरातील नेहमीसारखी पोळी / भाकरी, भाजी, वरण-भात हा योग्य आहार आहे. डॉक्टरांच्या/आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रथिने व जीवनसत्वांसाठी काही पूरक आहार घेता येतो. योग्य आहार घेतल्यास ताकद कायम राहते, रोजच्या कामांसाठी उत्साह मिळतो, किमोथेरपीचे इतर साईड इफेक्ट कमी होण्यास मदत होते आणि जंतुसंसर्गाचा धोका कमी होतो.
मात्र किमोथेरपीनंतर होणाऱ्या त्रासांप्रमाणे काही वेळा यात बदल करावा लागतो. उलट्या होत असतील तर पातळ पदार्थ (सूप, मीठ-साखर-पाणी, ताक, सरबते) जास्त प्रमाणात घ्यावेत. अति तिखट, मसालेदार, तेलकट खाणे टाळावे. एकाच वेळी खूप खाण्यापिण्याऐवाजी थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खात - पित राहावे. जुलाब होत असल्यास/तोंड 'आले' असल्यास सौम्य पदार्थ (मऊ वरण-भात, दही-भात, फळांचा गर) खावा, दूध टाळावे.
अतिप्रमाणात मांसाहार / कोणत्याही स्वरूपाची प्रथिने किमोथेरपी घेत असताना पचवणे कठीण जाते. त्यामुळे असे पदार्थ डॉक्टरांच्या / आहारतज्ञांच्या सल्ल्याशिवाय आहारात वाढवू नये.
कच्चे अन्न (फळे, भाज्या, कोशिंबिरी इ) बद्दल अनेक वाद-प्रतिवाद आहेत. कच्चे अन्न खाल्ल्याने जंतुसंसर्गाचा धोका वाढतो, फळांवर फवारलेल्या कीटकनाशकांमुळे अपाय होऊ शकतो किंवा ल्युकेमियाच्या रुग्णांमध्ये किडनीचे त्रास उदभवू शकतात ही त्यामागची कारणे असू शकतील. त्यामुळे कच्चे काहीही खाऊ नये, फळेदेखील शिजवून खावीत असे मानणारा एक गट आहे. किमोथेरपीनंतर शिजवलेले अन्न खावेसे वाटत नाही, किंबहुना अन्न शिजताना येणाऱ्या वासानेसुद्धा मळमळायला लागते अशी अनेक रुग्णांची तक्रार असते. त्यामुळे कच्चे खायचे नाही आणि शिजवलेले जात नाही अशी त्यांची दुहेरी कोंडी होते. याबद्दल काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यातः
१. कच्चे अन्न (ताजी फळे, सलाड्स) खाल्ल्याने जंतुसंसर्गाचा धोका वाढतो असे सिद्ध करणारा कोणताही शोध - निबंध उपलब्ध नाही.
२. भारतात फवारली जाणारी बहुतेक कीटकनाशके ऑरगॅनोफॉस्फेट वर्गातील चरबीत वितळणारी (लायपोफिलिक) असतात, ही जर फळात शिरली असतील तर उकडल्याने ती नष्ट होत नाहीत. बहुतेक वेळा ही फळांच्या सालीत असतात त्यामुळे खाण्यापूर्वी फळांची साले काढल्यास हा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
३. फळांमधील ‘ब’जीवनसत्वे पाण्यात विरघळणारी असतात, ती उकळत्या पाण्याने नष्ट होतात.
४. फळांना उग्र असे वास येत नाहीत, फळे / सलाड्समधील तंतुंमुळे (फायबर) किमोथेरपीनंतर होणारा बद्धकोष्ठाचा त्रास कमी होऊ शकतो. काही खावेसेच वाटत नाही' अशी तक्रार असणाऱ्या रुग्णांना दूध - फळे (मिल्क - शेक, शिक्रण, फ्रूट - सलाड अश्या कोणत्याही स्वरूपात) खाणे सोपे जाते.
५. अॅक्युट ल्युकेमिया / लिम्फोमाच्या काही रुग्णांना किमोथेरपीच्या सुरुवातीला पेशी नष्ट झाल्याने किडनीचे त्रास होऊ शकतात (ट्युमर लायसिस सिन्ड्रोम). अशा रुग्णांमध्ये रक्तातील पोटॅशियमचे प्रमाण वाढते, त्यावेळे फळे टाळावीत.
सुकी फळे/सुकामेवा मात्र बरेच दिवस साठवलेला असतो, बदाम-पिस्ते - काजू- अक्रोड-अंजीर-बेदाणे खाताना शक्यतो दुधात शिजवून / तुपात तळूनच खावेत.
किमोथेरपीनंतर घराबाहेर हॉटेलात / हातगाड्यांवरील अन्न खाऊ नये. शिळे, उघड्यावर राहिलेले पदार्थ टाळावेत. पण याचा अर्थ चमचमीत / चटक मटक पदार्थ खाऊच नयेत असा नाही. उलट रुग्णांना नेहमीच्या पोळी-भाजीच कंटाळाच येतो आणि चिवडा, वडा-भजी, भेळ, पिझ्झा, वेफर्स असे पदार्थ खावेसे वाटतात, हे पदार्थ घरी केल्यास खायला काहीच हरकत नसते.
काही सोपी पथ्ये पाळल्यास किमोथेरपीनंतर आहारचा समतोल राखला जातो.
१. एकाच वेळी भरपेट खाण्याऐवजी थोडे थोडे करून खूप वेळा खा.
२. सावकाश खा. सावकाश याचा अर्थ केवळ 'कमी वेगाने" असा नसून 'स + अवकाश' (अवकाश=स्पेस) असाही असू शकतो हे लक्षात घ्या. ताटावरून पोटात थोडी जागा (स्पेस) ठेवूनच उठा, यामुले उलटी- मळमळीचा त्रास कमी होण्यास मदत होते. थोड्या वेळाने भूक लागल्यास परत खा.
३. पुरेसे पाणी-द्रव पदार्थ घ्या, याचा अन्न पचनासाठी उपयोग होतो.
४. खाण्या-पिण्याच्या आवडीनिवडींबद्दल डॉक्टर / आहारतज्ञांशी चर्चा करा. नावडते पदार्थ केवळ ‘पथ्य' म्हणून खावे लागल्यास जेवण आपोआपच कमी होते.
५. ‘डाएट-चार्ट’/आहार - तक्ता हा लिहायला आणि द्यायला सोपा, पण अंमलात आणणे अतिशय अवघड असते. उदा: सकाळी न्याहरीसाठी पोहे - उपमा-मिश्र धान्याचे थालिपीठ असा मेन्यू लिहिलेला असतो आणि रुग्णाला 'नूडल्स' खाण्याची इच्छा होते ! त्यामुळे अशा चार्टचा आग्रह न धरता चर्चा करून आपणच आपला मेन्यू ठरवावा.
६. कमी खाल्ल्याने नुकसानच होते असे नाही. सकाळ-दुपारचे जेवण व्यवस्थित झाले असल्यास रात्री खाण्याची इच्छा न होणे स्वाभाविकच आहे, अशा वेळी काही न खाल्ल्यासही चालते.
किमोथेरपीनंतरच्या आहाराचा विनाकारण बाऊ केला जाऊ नये, कॅन्सर किंवा त्याच्या उपचारादरम्यानदेखील आपली रोग-प्रतिबंधक यंत्रणा बराच काळ पुरेशी भक्कम असते. किमोथेरपीनंतर पथ्यांना घाबरून काहीच आहार न घेणे हे जास्त धोकादायक असते.
- Oncologist in Pune | Cancer Specialist | Dr. Chetan Deshmukh
« Prev
Next
»