किमोथेरपीमुळे होणारे त्रास- उलटी-मळमळ.
उलटी होणे ही शरीराची बचावात्मक क्रिया आहे. एखादी त्रासदायक गोष्ट शरीरात आली तर या उलटीच्या क्रियेला सुरुवात होते. मेंदूच्या खालच्या भागात उलटीवर नियंत्रण ठेवणाऱ्या केन्द्रातून उत्पन्न होणाऱ्या लहरींद्वारे जठराचे स्नायु आकुंचन पावतात, जठर आणि अन्ननलिकेची झडप उघडते आणि जठरातील पदार्थ उलट दिशेने (म्हणजे जठराकडून अन्ननलिकेतून तोंडाच्या दिशेने) फेकले जातात. या क्रियेलाच 'उलटी होणे' म्हणतात. किमोथेरपीच्या औषधांमुळे या उलटीच्या केन्द्राला चालना मिळते आणि म्हणूनच किमोथेरपीमुळे उलट्या होतात. याचे ३ प्रकार आहेत.
१. किमोथेरपीच्या नंतर लगेच होणाऱ्या उलट्या (ॲक्यूट एमेसिस): ओन्डॅनसेट्रॉन सारख्या औषधांमुळे ही समस्या बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे.
२. किमोथेरपीनंतर उलटी होणे (डिलेय्ड - उशीराने होणारे) एमेसिस: या प्रकारात किमोथेरपी घेऊन घरी गेल्यावर २ - ३ दिवसांनी या उलट्या सुरू होतात. याच्यासाठी डेक्सामिथॅसोन किंवा अॅप्रेपिटन्ट सारखी औषधे वापरतात. जास्त उलट्या झाल्या (२ पेक्षा जास्त किंवा खाणे-पिणे बंद झाल्यास) डॉक्टरांशी संपर्क साधावा.
३. किमोथेरपीच्या आधीच उलट्या (ॲन्टिसिपेटरी एमेसिस): या विचित्र प्रकारात रुग्णांना किमोथेरपीच्या नुसत्या आठवणीने देखील किमोथेरपीच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी रुग्णालयात आल्यावर लोकांना उलट्या सुरू होतात. याच्यासाठी लोराझेपाम सारखी औषधे दिली जातात. किमोथेरपीमुळे होणाऱ्या उलट्या टाळाव्या कशा ?
१. किमोथेरपीआधी शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे असावे.
२. किमोथेरपी घ्यायला जाताना उपाशीपोटी जाऊ नये, हलका, कमी तेलकट, कमी तिखट नाश्ता करावा.
३. किमोथेरपी घेत असताना खाणे-पिणे ठेवण्यास हरकत नसावी, जेवण कमी आणि हलके घ्यावे. गाणी ऐकणे, पुस्तके वाचणे, टीव्ही पाहणे या सारख्या क्रियांमधे मन रमवावे.
४. स्त्रिया, लठ्ठ, घाबरलेले रुग्ण, बस - विमानप्रवासात उलट्या होणारे रुग्ण आणि काही कारणास्तव पूर्वी उलट्या झालेल्या रुग्णांना किमोथेरपीमुळे उलट्या होण्याची शक्यता जास्त असते. पुरुषांना, मानसिकदृष्ट्या कणखर लोकांना उलट्या कमी होतात.
५. उलट्या होऊ लागल्यास डॉक्टरांनी दिलेली औषधे योग्य त्या पद्धतीने घ्यावी. एखादी उलटी झाली तरे दुर्लक्ष करू नये. त्या एका उलटीनंतर येणारी मळमळीची भावना पुढची उलटी होण्यासाठी कारणीभूत असू शकते.
६. फक्त साधे पाणी घेण्याऐवजी क्षारयुक्त पाणी (मीठ-साखर-पाणी, इलेक्ट्रॉल, सरबते, सूप, शहाळ्याचे पाणी) घ्यावे. एका वेळी खूप पाणी पिणे शक्य नसल्याने थोडे थोडे पाणी / द्रव पदार्थ सतत पीत राहावे. लघवीच्या प्रमाणाकडे लक्ष ठेवावे, लघवी कमी किंवा गडद / पिवळ्या रंगाची होणे हे शरीरातील पाणी कमी झाल्याचे लक्षण आहे, यासाठी डॉक्टरांना भेटावे.
६. काही रुग्णांना उलटीपेक्षा जास्त मळमळीची भावना त्रासदायक असते. या रुग्णांनी फळांचा रस, ताक, लस्सी, इलेक्ट्रॉल, सरबते, आईसक्रीम यासारख्या पदार्थांवर भर द्यावा. आले, लिंबू आणि मध याचे समप्रमाण मिश्रणसुद्धा काही लोकांना लागू पडते.
किमोथेरपीदरम्यान योग्य ती काळजी व आहार घेतल्यास उलट्या होण्याची शक्यता खूप कमी असते. तरीही उलट्या होऊ लागल्यास डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.
- Oncologist in Pune | Cancer Specialist | Dr. Chetan Deshmukh