CHEMOTHERAPY MUCOSITIS

CHEMOTHERAPY MUCOSITIS

किमोथेरपीनंतरः तोंड येणे
आपल्या तोंडाच्या आतील त्वचा (ज्याला वैद्यकीय भाषेत म्युकोझा म्हणतात) म्हणजे एक गुळगुळीत पातळसर आवरण असते. या आवरणाखाली तोंडाच्या आतील भागातील संवेदना जाणणाऱ्या चेतासंस्थेच्या नसा असतात. हे आवरण पातळ असल्याने तोंडाच्या आतील कठिण-मऊ स्पर्श, अन्नाच्या चवीतील किंवा तापमानातील बदल या नसा ओळखू शकतात. या नसांवर जर थेट अन्न किंवा पाणी पडले तर या अतिसंवेदनाक्षम नसा दुखावल्या जातात आणि अन्न खाताना किंवा पाणी पिताना दुखते. यालाच आपण तोंड येणे (वैद्यकीय भाषेत म्युकोसायटिस) म्हणतो.
या आवरणाला दात घासताना, कठीण, तिखट किंवा अति गरम / गार पदार्थ खाल्याने वररचेवर इजा होत असते. पण या आवरणाची खासियत अशी आहे की ही इजा लगेच भरून येते. या आवरणातील पेशींच्या वाढीच्या जलदगतीमुळेच हे शक्य होते.
किमोथेरपी अथवा रेडियोथेरपी या उपचारांचा उद्देशच मुळी जलदगतीने वाढणाऱ्या पेशींवर मारा करणे हा असल्याने किमोथेरपीनंतर काही लोकांच्या या आवरणातील पेशी निकामी होतात आणि हे आवरण काही ठिकाणी चक्क फाटते आणि आतील नसा उघड्या पडतात. अशा पद्धतीने तोंड ‘आले’ असताना अन्न खाताना दुखते, रुग्णाची खाण्याची इच्छा मंदावते, पाणीसुद्धा प्यावेसे वाटत नाही आणि रुग्ण अशक्त होत जातो. काही वेळेस ही आवरणाची इजा गंभीर रूप धारण करते आणि तोंडात जखमा होतात आणि त्याजागी जंतुसंसर्ग होऊन ताप येऊ शकतो. या त्रासालाच काही लोक किमोथेरपीची उष्णता म्हणतात. भारतीय जेवणात सर्व पदार्थांमध्ये (अगदी चहात देखील) मसाला घातला जातो. असे मसालेदार पदार्थ तोंड आलेल्या रुग्णांना अतिशय तिखट लागतात आणि
म्हणून रुग्ण या त्रासाला जास्त घाबरतात.
हा त्रास टाळता येतो का ? याचे उत्तर काही प्रमाणात हो असे द्यावे लागेल.
१. किमोथेरपीआधी दातांची तपासणी करून किडलेले दात स्वच्छ करून घ्यावे.
२. किमोथेरपीदरम्यान भरपूर पाणी / द्रवपदार्थ प्यावेत.
३. प्रत्येक खाण्यानंतर सौम्यशा माऊथवॉशने चूळ भरावी. साधे मीठ / खाण्याचा सोडा घातलेले पाणी माऊथवॉश म्हणून वापरायला हरकत नाही.
४. काही किमोथेरपीची औषधे वापरताना तोंड येऊ नये यासाठी डॉक्टर चघळण्यासाठी औषधी गोळ्या देऊ शकतात.
५. किमोथेरपी घेताना बर्फाचे खडे तोंडात ठेवण्याने तोंड येण्याचे प्रमाण कमी होते, मात्र हा उपाय किती काळ करता येतो हे सांगणे अवघड आहे. जर तोंड आलंच तर:
१. रुग्णाने सोसतील असा आहार घेणे सुरूच ठेवावे.
२. अन्न गार करून खावे. वरण भाताऐवजी दही-भात, दूध-भात घ्यावा. आंबट नसलेले दही-ताक घ्यावे. कुस्करलेली फळे शिजवून रुग्णांना देता येतात.
३. सरबते / इलेक्ट्रॉलच्या मिश्रणाचा बर्फ करून आईसकॅन्डीसारखा चोखल्याने पोटात पाणी जाते आणि तोंडातील वेदना कमी होतात.
४. रेडियोथेरपीमुळे तोंड आल्यास तो त्रास लगेच बरा होत नाही, त्यासाठी जेवणाची पर्यायी व्यवस्था करावी लागते (नाकातून / पोटातून नळीद्वारे). याबद्दल आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी.
५. जर खूप तोंड आले असेल आणि अन्न-पाणी अजिबात कमी झाले असेल तर अश्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करणे इष्ट असते.

- Oncologist in Pune | Cancer Specialist | Dr. Chetan Deshmukh





« Prev Next »