किमोथेरपीनंतर— केस गळणे.
किमोथेरपीचा सर्वात अप्रिय असा दुष्परिणाम म्हणजे केस गळणे. भारतीय समाजात केस 'जाणे' याला काही वेगळे अर्थ आहेत, त्यामुळे केस गळणे- विशेषकरून स्त्रियांचे- हा प्रकार अनेकांना नकोसा वाटतो. या त्रासापासून सुटका होण्यासाठी प्रसंगी किमोथेरपीला नकार देणारे रुग्ण असतात.
आपल्या केसांच्या मुळाशी केस तयार करणाऱ्या पेशी असतात. केरॅटिन प्रथिनाचे बनलेले हे केस चेतनाविरहित असतात (त्यामुळे केस कापताना दुखत नाही). केस तयार होण्याच्या क्रियेला वयानुरूप साधारण दीड ते ६ महिने लागू शकतात. नवीन केस उगवणे, वाढणे आणि जीर्ण होऊन गळणे हे चक्रही सुरूच असते. केस तयार करणाऱ्या या पेशी फारश्या वेगाने वाढत जरी नसल्या तरी सतत कार्यरत असतात आणि त्यामुळे त्यांच्यावर किमोथेरपीचा परिणाम होऊन त्या नष्ट होतात. किमोथेरपी दिल्यानंतर १७-१८व्या दिवशी केस गळायला सुरुवात होते. केस गळताना विशेष दुखत नाही, आंघोळीनंतर बरेच केस आपोआप गळून हातात येतात. किमोथेरपीनंतर केस गेल्याने डोके दुखणे, डोक्याला मुंग्या येणे, गार वाटणे, थंडी वाजणे अश्या तक्रारी काही रुग्णांकडून येतात, ज्यासाठी काही खास उपचार करावे लागत नाही. केस गेल्यावर घराबाहेर वावरताना केसांचा टोप (विग ) वापरणे, टोपी घालणे किंवा रुमाल/स्कार्फ डोक्याला गुंडाळणे असेच उपाय करावे लागतात.
सर्व रुग्णांचे ४ महत्वाचे प्रश्न असतात-
डॉक्टर, केस गळणे टाळता येत नाही का ?
तंत्रज्ञान इतके प्रगत झाले असताना यावर काहीच उपाय कसा नाही ? केस कधी परत येणार ?
मग माझे केस नक्की पहिल्यासारखेच परत येणार ना ?
यातल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर 'काही प्रमाणात होय' असे देता येईल. किमोथेरपीच्या काही औषधांमुळे तसेच सध्या उपलब्ध असलेल्या लक्ष्यवेधी उपचारांमुळे (टार्गेटेड थेरपीमुळे) केस गळत नाहीत हे सत्य असले तरी ही औषधे सर्वांना दिली जातील असे नाही. किमोथेरपी निवडताना डॉक्टर तुमच्या कॅन्सरसाठी सर्वाधिक परिणामकारक अशीच औषधे निवडतात. केवळ केस गळू नयेत म्हणून कॅन्सरसाठी कमी परिणामकारक किंवा वेगळीच औषधे निवडणे शास्त्रीयदृष्ट्या सर्वथा अयोग्य होय.
तंत्रज्ञानातील प्रगतीबद्दल बोलायचे तर किमोथेरपी देत असताना डोक्याला थंड करणारी टोपी ( कूलिंग कॅप) अस्तित्वात आहे. विजेवर चालणारी ही टोपी किमोथेरपी प्रत्यक्ष घेत असताना डोक्यावर घातल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होते असा ही टोपी बनवणाऱ्या कंपनीचा दावा आहे, पण त्यावर भारतात तरी फारसे संशोधन झालेले नाही, शिवाय तिच्या वापराबद्दल वेगवेगळे वाद आहेत ते निराळेच.
केस परत कधी येतील हे सांगणे सोपे आहे. किमोथेरपीचे सगळे कोर्स (सायकल्स) झाल्यानंतर केस पुन्हा येण्यास सुरुवात होते. पण भरपूर (म्हणजे चारचौघात वावरता येईल इतके) केस यायला मात्र ८ - १० महिने लागतात.
किमोथेरपीनंतर केस येतच नाहीत असे होत नाही. पण केस पहिल्यासारखेच येतील असे सांगणे खरोखर अवघड आहे कारण केस पुन्हा येण्याची क्रिया पूर्वीच्याच जोमाने होईल की संथ होईल हे सांगता येत नाही. वाढते वय, कॅन्सर, किमोथेरपीमुळे शरीराची झालेली हानी, आहारावर झालेला परिणाम, मानसिक ताण आणि नैराश्य या सर्व गोष्टींचा केसांचा वाढीवर परिणाम होऊ शकतो. किमोथेरपीनंतर केस गळत असताना सौम्य साबण किंवा शॅम्पू वापरता येतो. किमोथेरपीनंतर केस पुन्हा येताना नेहमीप्रमाणेच डोक्यावरून आंघोळ करण्यास किंवा तेल लावण्यास हरकत नसते. केस पूर्वीसारखेच येण्यासाठी आहारात आवश्यक प्रथिनांचा समावेश असावा. नवीन येत असलेल्या केसांना शक्यतो रंग/कलप लावू नये. किमोथेरपी संपल्यावर मनातली मरगळ झटकून टाकून पुन्हा नव्या उत्साहाने पूर्वीचा दिनक्रम सुरू ठेवावा.
केस गळणे हा किमोथेरपीचा अपरिहार्य असा सहपरिणाम ( साईड इफेक्ट) आहे. त्याचा बाऊ करून उपचारात अडथळा आणण्याऐवजी त्याला सामोरे जाऊन उपचार घेतल्यास त्याची तीव्रता कमी भासेल आणि उपचार घेणे आणि देणे सुकर होईल.
- Oncologist in Pune | Cancer Specialist | Dr. Chetan Deshmukh