किमोथेरपीनंतरः ताप येणे
रुग्णांच्या लेखी किमोथेरपीमुळे केस गळणे चिंताजनक परिणाम आहे, तसाच किमोथेरपीनंतर ताप येणे हा डॉक्टरांच्या मते चिंताजनक परिणाम आहे. किमोथेरपीची औषधे वाढणाऱ्या पेशींना मारक असतात. आपल्या शरीरातील पांढऱ्या (संरक्षक) पेशी अतिशय वेगाने वाढतात, यांच्यावरही किमोथेरपीची औषधे मारा करतात. त्यामुळे किमोथेरपीनंतर पांढऱ्या पेशींची संख्या कमी होऊन जंतुसंसर्ग (इनफेक्शन) होण्याची शक्यता वाढीला लागते. पांढऱ्या पेशी कमी असताना जंतुसंसर्गामुळे आलेला तापासाठी तातडीचे वैद्यकीय उपचार गरजेचे असतात. याला फेब्राईल(म्हणजे ताप) न्यूट्रोपिनिया (पांढऱ्या पेशी कमी असणे) म्हणतात. हा ताप येण्याची कारणे कोणती ?
१. किमोथेरपी घेण्यापूर्वी रुग्ण अशक्त अथवा कुपोषित असणे.
२. रुग्णास किमोथेरपीआधी जंतुसंसर्ग असणे.
३. किमोथेरपीचा डोस किंवा प्रकार तीव्र स्वरूपाचा (बोली भाषेत - स्ट्रॉग किंवा हाय पॉवरची !) असणे.
४. किमोथेरपीदरम्यान खूप उलट्या होणे.
५. रुग्णास किडनी किंवा लिव्हरचे आजार असणे.
किमोथेरपी दिल्यानंतर ८ - १० दिवसांनी पांढऱ्या पेशी कमी होतात. य वेळी रुग्ण घरी असतात. ताप आल्यास घरात असलेली किंवा दुकानातून मनानेच औषधे आणून घेऊ नयेत. ताप आल्यास आपल्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी सर्वप्रथम संपर्क साधावा. रक्ताची चाचणी केल्यानंतरच पांढऱ्या पेशींचे प्रमाण कळू शकते, ही चाचणी करणे टाळू नये. पांढऱ्या पेशींची संख्या कमी असल्यास ताप आलेल्या रुग्णाला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करून सलाईनद्वारे प्रतिजैविके (ॲन्टिबायोटिक्स) घ्यावी लागतात. पांढऱ्या पेशींवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्या संख्येची रोज मोजदाद करावी लागते. उपचार घेण्यास उशीर केल्यास किंवा ताप अंगावर काढल्यास हा जंतुसंसर्ग उग्र रूप (सेप्टिसेमिया) धारण करून प्रसंगी रुग्णासाठी जीवघेणा ठरू शकतो. हा ताप टाळण्यासाठी काय करावे?
१. किमोथेरपीचे उपचार घेण्यापूर्वी किडनी, लिव्हर तसेच रुग्णाचे पोषण याची तपासणी होते.
२. किमोथेरपी घेऊन घरी गेल्यावर रुग्णांनी जंतुसंसर्गाची काळजी घ्यावी. पाणी उकळून घ्यावे, बाहेरचे अन्न खाऊ नये. शिळे पदार्थ, उघड्यावर ठेवलेले अन्न खाऊ नये.
३. गर्दीची ठिकाणे (बस / रेल्वे स्टेशन, सभा समारंभ) टाळावीत. डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयात गेल्यावर गर्दी असल्यास डॉक्टरांना तशी कल्पना द्यावी.
४. घरात/कामाच्या ठिकाणी सर्दी/खोकला किंवा ताप आलेल्या व्यक्तिंपासून लाब राहावे.
सध्या किमोथेरपीनंतर पांढऱ्या पेशी कमी होऊ नये यासाठी विशेष औषधे उपलब्ध आहेत. यांना 'ग्रोथ फॅक्टर' असे म्हणतात. ज्या रुग्णांच्या पेशी कमी होण्याची शक्यता असते त्यांना ही औषधे इंजेक्शनच्या रूपात किमोथेरपीनंतर घरी जाताना दिली जातात. या ग्रोथ फॅक्टरच्या वापारामुळे किमोथेरपीनंतर ताप येण्याचे प्रमाण कमी झालेले आहे.
- Oncologist in Pune | Cancer Specialist | Dr. Chetan Deshmukh