CHEMOTHERAPY FATIGUE

CHEMOTHERAPY FATIGUE

किमोथेरपीनंतरः गळून जाणे/अशक्तपणा/थकवा.
किमोथेरपी घेऊन घरी गेल्यावर बऱ्याच रुग्णांना अशक्त वाटते, काही खावेसे वाटत नाही, फार हालचाल करावीशी वाटत नाही. नुसते बिछान्यावर पडून राहावेसे वाटते, कोणत्याही कामासाठी उत्साह राहत नाही. खरेतर बऱ्याच रुग्णांना नुसते पडून राहण्याची सवय नसते, त्यामुळे असे पडून राहावे लागत असल्याने त्यांची खूप चिडचिड होते, त्यांना उदास वाटते आणि काहींना नैराश्य येते. या सर्व लक्षणांना शास्त्रात 'फटीग ॲन्ड वीकनेस' असे म्हणतात. या तक्रारीची अनेक कारणे आहेत.
१. किमोथेरपीनंतर मळमळ, उलटी किंवा एकूणच अन्नावर वासना नसणे यामुळे रुग्ण अन्न-पाणी पुरेसे घेत नाहीत. यामुळे रक्तातील साखर कमी होऊन थकवा येणे साहजिकच आहे. मधुमेह (डायबेटिस) असणाऱ्या रुग्णांनाही काही प्रमाणात साखर आवश्यक असते. त्याचप्रमाणे सोडियम, पोटॅशियम यासारखे शरीरातील क्षार कमी झाल्यास स्नायुंची काम करण्याची क्षमता कमी होते आणि काही करावेसे वाटत नाही. काही रुग्ण अन्न जात नाही म्हणून फक्त साधे पाणी पितात. यामुळे रक्तातील क्षार कमी होतात आणि थकवा येतो. किमोथेरपीमुळे होणाऱ्या उलट्या किंवा मळमळीने रुग्णांना समतोल आहार घेता येत नाही, आहारात आवश्यक ती प्रथिने, जीवनसत्वे (व्हिटॅमिन्स) कॅल्शियम, लोह यासारखी तत्वे घेतली जात नाहीत. किमोथेरपीनंतर नुसते पाणी न पिता साखर-मीठ- पाणी, सरबते, सूप यासारखे क्षार व साखरयुक्त पदार्थ घेत राहावे ज्यामुळे शरीराला ऊर्जा व चेतना मिळत राहते. समतोल आहार घेण्याचा प्रयत्न करावा. लोह, कॅल्शियम साठी आवश्यक ती औषधे घ्यावी.

२. किमोथेरपीच्या औषधांमुळे चेतासंस्थेवर (नर्व्हस सिस्टिम) विपरीत परिणाम होऊ शकतो. सिसप्लॅटिन, कार्बोप्लॅटिन, व्हिनक्रिस्टीन किंवा पॅक्लिटॅक्सेल सारख्या औषधांमुळे हातापायांच्या नसांवर परिणाम होऊन, हातापायाची आग होणे, मुंग्या येणे, चालताना तोल जाणे तसेच हातापायातील शक्ती कमी झाल्यासारखे वाटणे यासारखे त्रास होऊ शकतात. यामुळे रुग्णांना शक्तिहीन झाल्यासारखे वाटते, हातापायातील त्राण गेल्यासारखे वाटते. मधुमेह (डायबेटीस) असणाऱ्या किंवा 'ब' जीवनसत्वाची (विशेषकरून बी - ६ किंवा बी-१२ या उपघटकांच्या ) कमतरतेमुळेही नसांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो व त्यामुळे स्नायुंमधली ताकद कमी होते आणि थकवा येतो. नसांच्या या तक्रारींकरिता औषधे उपलब्ध आहेत.

३. किमोथेरपीनंतर रक्तातील पेशींचे प्रमाण कमी होते. काही वेळा पांढऱ्या पेशी कमी असणाऱ्या रुग्णांना ताप येत नाही, अचानक खूप थकवा येऊन फक्त पडून राहावेसे वाटते. हे जंतुसंसर्गाचे लक्षण असू शकते. तांबड्या पेशी कमी झाल्याने रक्तात ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नाही व शरीराची हालचाल मंदावते. या दोन्हींमुळे अतिशय थकवा येऊ शकतो. अशा वेळी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्वरित उपचार घेणे गरजेचे आहे.

४. पुरेशी झोप न होणे, व्यायामाचा अभाव यामुळेही रुग्णांना थकवा जाणवू शकतो. किमोथेरपी सुरू असताना अगदीच बिछान्यावर पडून राहावे लागत नाही. घरातील नेहमीची कामे, हलका, न दमवणारा व्यायाम केल्यास शरीरातील मरगळ दूर व्हायला मदत होते. झोपेसंदर्भातील तक्रारींबद्दल आपले डॉक्टर काही उपाय सुचवू शकतील.

कॅन्सरमुळे झालेली शरीराची हानी, किमोथेरपी, ऑपरेशन किंवा रेडियोथेरपीच्या परिणामांमुळे सर्वतोपरी काळजी घेऊन सुद्धा थोडा थकवा येणे अपरिहार्य आहे. रुग्णांनी आपली दैनंदिन कामे ही गोष्ट गृहीत धरूनच ठरवावी, सलग काम किंवा आराम न करता अधूनमधून थोडा आराम व थोडी कामे करावी. घरकामात मदत घ्यावी, घराबाहेर पडताना एकट्याने जाऊ नये. वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी, शक्यतो वाहने स्वतः चालवणे टाळावे. नुसते पडून राहण्याऐवजी वाचन, संगीत किंवा छंदांमध्ये मन रमवावे. उलटी/मळमळीसाठीची व इतर औषधे वेळेत घ्यावी. यानंतरही थकवा वाढत राहिल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

- Oncologist in Pune | Cancer Specialist | Dr. Chetan Deshmukh





« Prev Next »