Immunity

Immunity

एका रुग्णाबरोबर किमोथेरपीवर चर्चा सुरू होती. किमोथेरपी कधी, कशी, कुठे याची चर्चा झाल्यावर हटकून येणार तो प्रश्न आलाच. " डॉक्टर तुम्ही किमोथेरपी देणार, मग माझी इम्युनिटी कमी होणार का? घराबाहेर पडायचंच नाही का, खायचं काय? इम्युनिटी वाढवण्यासाठी काही गोळ्या-इंजेक्शनं किंवा इतर काही उपचार घ्यावे का?"

इम्युनिटी/रोगप्रतिकारशक्ती/इम्युन पॉवर याबद्दल रुग्णांना बरंच कुतुहल(आणि आकर्षण) असतं. मुख्य म्हणजे इम्युनिटी हा एखादा वेगळा अवयव नाही. पदोपदी बदलणारी, नवनवीन माहिती मिळवून त्याप्रमाणे स्वत:मध्ये सुधारणा घडवणारी गतिमान यंत्रणा आहे. ही यंत्रणा प्रत्येकाला उपजत असतेच. बाहेरून होणारे जिवाणुंचे हल्ले आणि शरीरात होणारे काही अंतर्गत बिघाड रोखण्याचं काम ही यंत्रणा करते. ढोबळमानाने तिचे दोन प्रकार आहेत, सेल मिडिएटेड(पेशींची) किंवा ह्युमोरल मिडिएटेड (ॲंटिबॉडी-प्रतिपिंड) इम्युनिटी. जन्मल्यावर मनुष्य जसजसा मोठा होत जातो तसतसे विविध प्रतिजन(ॲन्टिजेन) त्याच्यावर चहुबाजूने अंगावर येत असतातच. या प्रतिजनांची माहिती झाल्यावर इम्युनिटी/प्रतिकारशक्तीला पुढच्या खेपेस त्याचा सामना करणं सोपं जातं. शरीराची अंतर्बाह्य राखण करण्याचं काम करणाऱ्या या यंत्रणेला ‘आपलं’ आणि ‘परकं’ कोण हे समजायला थोडा वेळ लागतो खरा पण एकदा हा फरक कळला की ही यंत्रणा अतिशय तत्परतेनं आपलं काम करते. अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं तर २०१९ साली आपल्यापैकी कोणाकडेही कोव्हिडविरुद्ध प्रतिकारशक्ती नव्हती, पण २०२४ मधे कोट्यवधी लोकांमध्ये ही प्रतिकारशक्ती आहे. याचं कारण आपल्या इम्युनिटीची नवीन प्रतिजन ओळखण्याची क्षमता. ही क्षमता व्यक्तिनुरूप कमी-जास्त होते खरी पण काही मर्यादेतच. अगदी दुर्मिळ(काही लाखात एखादी) व्यक्ति उपजतच इम्युनोडेफिशिएन्ट (प्रतिकारशक्ती गमावलेली किंवा प्रतिकारशक्ती अतिशय क्षीण असलेली) जन्मते. अशी बालकं गर्भावस्थेत किंवा अगदी लहान वयात विविध आजारांना बळी पडतात. एखादी व्यक्ति १५-२० वर्षांची होईपर्यंत कुठल्याही मोठ्या जंतुसंसर्गाशिवाय वाढली असेल तर तिची प्रतिकारशक्ती व्यवस्थित आहे असं मानायला हरकत नाही. काही आजार आणि काही औषधांमुळेही इम्युनिटी कमी होऊ शकते.

शरीराचं तापमान, रक्तदाब(ब्लडप्रेशर), हृदयाचे ठोके जसे अचूक मोजता येतात तशी प्रतिकारशक्ती/इम्युनिटी अचूक मोजण्याची कोणतीही शास्त्रीय पद्धत अस्तित्वात नाही. एखाद्याला जर वरचेवर जंतुसंसर्ग होत असेल तर त्याची इम्युनिटी कमी आहे असं मानलं जातं. कधीकधी इम्युनिटी आपला आणि परक्यातला फरक विसरते आणि स्वत:च्याच शरीरावर हल्ला करते. अशा आजारांना ऑटोइम्युन आजार म्हणतात. त्यामुळे इम्युनिटी चांगली असली तरी ती एका मर्यादेतच हवी.

आता वळू या रुग्णाच्या प्रश्नाकडे. कॅन्सरच्या उपचारांमुळे इम्युनिटी कमी होते का? होय, कॅन्सरच्या उपचारांमुळे पांढऱ्या पेशी कमी होतात आणि आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते. पण ह्या पेशी काही काळातच वाढतात आणि प्रतिकारशक्ती पूर्ववत होते. दीर्घकालीन स्टेरॉईड्स, पुरेसा आहार न घेणं किंवा आजारामुळे (कॅन्सरमुळे) प्रतिकारशक्ती क्षीण होते. बरेच दिवस उपचार घेणाऱ्या, आजार आटोक्यात नसणाऱ्या रुग्णांना जंतुसंसर्गापासून जपायला लागतं ते याचसाठी. मग ही इम्युनिटी वाढवायची कशी? इम्युनिटी वाढवण्यासाठी (किंवा आहे त्यापेक्षा ती अधिक कार्यक्षम करण्यासाठी) कोणताही झटपट मार्ग नाही. कुठल्याही गोळ्या, इंजेक्शनं, फळं, हळद, तुळस, लिंबू (आणि समाजमाध्यमांवर सुचवले जाणारे अनेक उपाय) यांच्यामुळे इम्युनिटी वाढते असा शास्त्रीय पुरावा नाही. अशा उपायांशिवाय आपली प्रतिकारशक्ती/इम्युनिटी आपलं काम योग्यरितीने अनेक वर्ष करत आलेली आहे आणि यापुढेही करेलच. इतर अनेक शरीरक्रियांप्रमाणेच इम्युनिटी/प्रतिकारशक्तीवर आपले थेट नियंत्रण नाही. त्यामुळे इम्युनिटी वाढवायला काही खास करायलाच हवं असंही नाही, निसर्गनियमाप्रमाणे ती काम करतच राहील.

इम्युनिटीची परिणामकारकता राखाला पुढील काही उपाय दीर्घकाळ केल्ये तर फायदा होऊ शकेल.
१. योग्य आहार- समतोल, पोषक, फळं-भाज्या, योग्य प्रमाणात प्रथिनं (प्रोटिन्स) असलेला आणि तेल-तूप मर्यादेत असलेला आहार असावा.
२. शारिरीक हालचाली- चालण्यासारखी सोपी (एरोबिक) क्रिया, धावणे, पोहणे, ट्रेकिंग, सायकलिंग सारखे आणि स्नायुंची ताकद वाढवणारे व्यायाम केल्याने प्रतिकारशक्ती भक्कम राहते.
३. वजन आटोक्यात ठेवणे.
४. पुरेशी झोप घेणे- झोपेची गरज वयानुसार बदलत जाते. आपापल्या वयानुसार चांगली झोप घेतल्यास इम्युनिटी चांगली राहते असं आढळून येत आहे.
५. निर्व्यसनी राहणे- दारू/सिगरेट/तंबाखू सारख्या व्यसनांमुळे प्रतिकारशक्ती कमी होते.

- Oncologist in Pune | Cancer Specialist | Dr. Chetan Deshmukh





« Prev Next »