ब्रेस्ट कॅन्सर साठीच्या चाचण्या :
१. तज्ञांद्वारे तपासणी: स्तनात उद्भवलेली प्रत्येक गाठ कॅन्सरची असते असं नाही. एखाद्या गाठीसाठी अजून तपासण्या होणं आवश्यक आहे किंवा कोणतीही तपासणी करायची गरज नाही हे तज्ञ डॉक्टर त्यांच्या अनुभवाच्या जोरावर ठरवू शकतात. याचबरोबर शरीराच्या इतर भागांमध्ये कॅन्सरची लागण झालेली आहे अथवा नाही याचाही अंदाज तज्ञांना येऊ शकतो.
२. मॅमोग्राफी: ही तपासणी म्हणजे स्तनांचा काहीश्या वेगळ्या पद्धतीने काढलेला एक्स-रे आहे. स्त्रीच्या स्तनातली गाठ कॅन्सरची असण्याची शंका तज्ञांना वाटत असल्यास ही तपासणी करतात. मॅमोग्राफी करताना थोडंसं दुखू शकते. मॅमोग्राफीमुळे गाठीचा आकार, काखेतील गाठी व गाठीच्या स्वरूपाबद्दल अंदाज येऊ शकतो. काही वेळा स्तनात असलेल्या पण हातांना न जाणवणाऱ्या गाठी या मॅमोग्राफीतच दिसू शकतात.
३. पॅथॉलॉजीच्या चाचण्या : गाठ नेमकी कशाची आहे याचं अचूक उत्तर फक्त पॅथॉलॉजिस्ट देऊ शकतात. त्यासाठी गाठींमधल्या पेशी सूक्ष्मदर्शकातून तपासाव्या लागतात. या पेशी मिळवण्यासाठी २ मार्ग आहेत.
अ) लहानश्या सुईद्वारे पेशींची चाचणी - फाईन नीडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी (एफ. एन. ए.सी) : गाठ लहान असेल तर या चाचणीद्वारे निदान लवकर होते. रुग्ण बाह्यरुग्ण विभागात (ओ.पी.डीत) असतानाही ही सहज आणि चटकन होणारी चाचणी आहे. एका बारीक सुईने गाठीतल्या पेशी काढून काचेच्या स्लाईडवर पसरवून त्या तपासल्या जातात. फारसं दुखत नसल्यामुळे भूल देण्याची गरज नसते आणि एका दिवसातच चाचणीचा निष्कर्ष हाती येऊन पुढील निर्णय घेता येतात. पण या चाचणीचे काही तोटे आहेत. या चाचणीत पुरेश्या पेशी मिळू शकत नाहीत, त्यामुळे पॅथॉलॉजीच्या इतर तपासण्या यावर करता येत नाहीत. तसेच काही वेळा गाठीतून पेशी न येता फक्त रक्त येऊ शकते आणि कॅन्सर असतानाही रिपोर्ट 'निगेटिव्ह' (म्हणजे कॅन्सर नाही) असा येऊ शकतो. त्यामुळे ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास गोष्ट निराळी, पण निगेटिव्ह चाचणी ही तज्ञांना दाखवूनच स्वीकारावी.
ब) बायोप्सीः गाठीचा एक छोटा तुकडा काढून प्रयोगशाळेत पाठवला जातो. पूर्वी ही चाचणी एक शस्त्रक्रियेद्वारे व्हायची, ती आता 'टू-कट गन' या साधनामुळे एफ.एन.ए.सी इतकीच सोपी झाली आहे. गाठीच्या या तुकड्यात पुरेश्यी पेशी असल्यामुळे या पेशींचे स्वरूप, त्यांची रचना इ. बद्दल अधिक माहिती मिळू शकते. पॅथॉलॉजीच्या काही विशेष चाचण्या देखील या तुकड्यावर करता येतात. एफ. एन. ए. सीप्रमाणेच ही चाचणी सुद्धा बाह्यरुग्णविभागातच करता येते, भूल देण्याची आवश्यकता नसते. या चाचणीचे निष्कर्ष हाती येण्यास मात्र ३ - ७ दिवस लागू शकतात.
स्तनातील गाठ थोडी मोठी असेल आणि ऑपरेशनच्या आधी किमोथेरपीचे उपचार घ्यावे लागणार असतील तर एफ. एन. ए. सी ऐवजी बायोप्सीच करणे जरूरीचे आहे.
- Oncologist in Pune | Cancer Specialist | Dr. Chetan Deshmukh