BREAST CANCER SURGERY

BREAST CANCER SURGERY

ब्रेस्ट कॅन्सरसाठीच्या शस्त्रक्रिया / ऑपरेशन:
शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन हा ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारातला एक महत्वाचा भाग आहे. (कॅन्सरचं ऑपरेशन केल्यानं तो अधिक वेगाने पसरतो हा गैरसमज आहे याला कोणताही शास्त्रीय आधार नाही).
ब्रेस्ट कॅन्सरसाठी ३ प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात
१. मॉडिफाईड रॅडिकल मास्टेक्टॉमी: यात संपूर्ण स्तन व काखेतल्या गाठी काढल्या जातात. ब्रेस्ट कॅन्सरसाठीची ही अनेक वर्षांपासून सुरू असलेली शस्त्रक्रिया आजही अनेक स्त्रियांवर केली जाते. भारतात बहुतेक स्त्रियांच्या रोगनिदानाच्या वेळी त्यांच्या कॅन्सरच्या गाठी जास्त वाढलेल्या असतात आणि त्यामुळे या स्त्रियांमध्ये स्तन वाचवण्याची शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. संपूर्ण स्तन काढण्याचा एक फायदा म्हणजे काही (काही - सर्व नाही !) स्त्रियांमध्ये ऑपरेशननंतर रेडियोथेरपी टाळता येते. तसेच कॅन्सर स्तनात पुन्हा उद्भवण्याची शक्यता थोडी कमी असते.
संपूर्ण स्तन काढून टाकल्यानंतर पुढे कोणतेही उपचार घ्यावे लागणार नाहीत असा एक गैरसमज आहे. संपूर्ण स्तन काढल्यावर देखिल किमोथेरपी आणि/अथवा रेडियोथेरपीचे उपचार घ्यावे लागू शकतात.
२. ब्रेस्ट कॉन्झर्विंग सर्जरी: संपूर्ण स्तन न काढता फक्त स्तनातील गाठ व तिच्या आजूबाजूचा थोडासा भाग काढला जातो. एक वेगळा छेद घेऊन काखेतल्या गाठी काढल्या जातात. कॅन्सरचे निदान होतेवेळी जर गाठ लहान असेल तर या शस्त्रक्रियेचा पर्याय खुला राहतो. मात्र या शस्त्रक्रियेनंतर रेडियोथेरपी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे ज्या स्त्रियांना रेडियोथेरपी घेता येणार नसेल अशा स्त्रियांवर स्तन वाचवण्याची शस्त्रक्रिया केली जात नाही. स्तन वाचवल्यास गाठ पुन्हा उद्भवू शकते ( आणि म्हणून संपूर्ण स्तन काढलेलाच बरा) ह्या भीतीला कोणताही शास्त्रीय आधार नाही. स्तन वाचवणारी शस्त्रक्रिया करून नंतर रेडियोथेरपी घेणे हे संपूर्ण स्तन काढण्याइतकेच परिणामकारक आहे. संपूर्ण स्तन काढण्याप्रमाणेच या शस्त्रक्रियेनंतर देखिल किमोथेरपी घ्यावी लागू शकते. स्तन वाचवल्यास स्त्रीला आपण कॅन्सरनंतरही 'नॉर्मल' असल्याची भावना राहते.
या दोन्ही शस्त्रक्रियांबद्दल रुग्णांनी डॉक्टरांशी अगोदर सविस्तर चर्चा करावी. प्रत्येक रुग्णामध्ये दोन्ही शस्त्रक्रियांचे फायदे-तोटे असतात, खर्च, होणारा त्रास, नंतर घ्यावी लागणारी काळजी या समजावून न घेतल्यास नंतर अडचणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. दोन्ही शस्त्रक्रियांमध्ये कॅन्सर संपूर्णपणे काढून टाकणे ह्याच मुद्दयाला प्राधान्य दिले जाते. स्तन वाचवण्यासाठी कॅन्सर शरीरात राहणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली जाते. ब्रेस्ट कॅन्सरसाठी या दोन्हीपैकी कोणती शस्त्रक्रिया करणे योग्य ठरेल याचा अंतिम निर्णय कॅन्सरतज्ञच घेऊ शकतात पण या निर्णयप्रक्रियेत रुग्णांनी सहभागी होणे अपेक्षित आहे.
३. पॅलिएटिव (त्रास कमी करणारी) मास्टेक्टॉमी: काही रुग्ण आजार अतिशय वाढलेल्या अवस्थेत डॉक्टरांकडे येतात. त्यांचा आजार इतर अवयवांमध्येही पसरलेला असतो पण स्तनातील गाठ मोठी होऊन फुटलेली असते किंवा तिथे जंतुसंसर्ग होऊन पू/रक्त वाहत असते व त्याची दुर्गंधी येत असते (होय, एकविसाव्या शतकातल्या भारत देशात आजही असे रुग्ण येतात). अशा वेळी रुग्णाची आणि त्याच्या घरातील इतर लोकांची या जखमेच्या त्रासापासून मुक्तता करण्यासाठी फक्त स्तन काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांमध्ये पसरलेल्या कॅन्सरसाठीची शस्त्रक्रिया केली जात नाही.

- Oncologist in Pune | Cancer Specialist | Dr. Chetan Deshmukh





« Prev Next »