Exercise — A Powerful Medicine Against Cancer

नियमित व्यायाम केवळ तब्येत सुधारत नाही, तर कर्करोग पुन्हा होण्याचा आणि मृत्यूचा धोकाही लक्षणीयरीत्या कमी करतो.


Exercise — A Powerful Medicine Against Cancer

व्यायाम — कर्करोगावरचं एक प्रभावी ‘औषध’

मोठ्या आतड्याच्या (कोलन) कर्करोगावरील नव्या जागतिक संशोधनाचा सोपा आढावा

“केमोथेरपी संपली, आता काय?” — कर्करोगातून बाहेर पडलेल्या अनेक रुग्णांच्या मनात हा प्रश्न असतो. जुलै २०२५ मध्ये जगातील अत्यंत मान्यवर वैद्यकीय नियतकालिक New England Journal of Medicine (NEJM) मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका महत्त्वपूर्ण संशोधनाने या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर दिले आहे:

नियमित व्यायाम केवळ तब्येत सुधारत नाही, तर कर्करोग पुन्हा होण्याचा आणि मृत्यूचा धोकाही लक्षणीयरीत्या कमी करतो.

संशोधन नेमकं काय होतं?

कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इतर काही देशांतील ५५ रुग्णालयांमध्ये (‘CHALLENGE’ अभ्यास) झालं. यात मोठ्या आतड्याच्या कर्करोगासाठी शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी पूर्ण केलेल्या ८८९ रुग्णांचा समावेश होता.

रुग्णांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले:

१. व्यायाम गट - तीन वर्षे प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली नियमित व्यायाम कार्यक्रम.

२. तुलना गट- केवळ आरोग्यविषयक माहितीपत्रिका (व्यायाम व आहाराविषयी सामान्य सूचना).

त्यानंतर जवळपास ८ वर्षे दोन्ही गटांचा पाठपुरावा करण्यात आला.

काय आढळलं?

व्यायाम करणाऱ्या गटाचे परिणाम स्पष्टपणे अधिक चांगले होते.

मुद्दा

व्यायाम गट

तुलना गट

५ वर्षांनंतर कर्करोगमुक्त राहिलेले

८०.३%

७३.९%

८ वर्षांनंतर जिवंत राहिलेले

९०.३%

८३.२%

कर्करोग पुन्हा होण्याचा किंवा मृत्यूचा धोका 

२८% ने कमी 

---

मृत्यूचा धोका 

३७% ने कमी 

---

थोडक्यात - फक्त नियमित व्यायामामुळे मिळणारा हा फायदा अनेक प्रचलित कर्करोगविरोधी औषधांइतकाच प्रभावी असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही महागड्या औषधांची किंवा इंजेक्शनची आवश्यकता नाही.

व्यायाम म्हणजे नेमका किती?

घाबरण्यासारखं काही नाही. या अभ्यासात मॅरेथॉन धावण्याची गरज नव्हती. ध्येय होते. आठवड्यातून ३ ते ४ वेळा, प्रत्येक वेळी ४५ ते ६० मिनिटे, जलद चालणे किंवा त्याच दर्जाचा मध्यम स्वरूपाचा व्यायाम रुग्णांना त्यांच्या आवडीचा व्यायामप्रकार, वेळ आणि तीव्रता निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते.

हे का घडत असावं?

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, शरीरातील सूज (Inflammation) कमी होते, इन्सुलिनचे संतुलन सुधारते, कर्करोग पेशींच्या वाढीस चालना देणारे काही घटक कमी होतात. विशेष म्हणजे हा फायदा केवळ वजन कमी झाल्यामुळे नव्हता; व्यायाम स्वतःच परिणामकारक ठरला.

एक काळजीची बाजू

व्यायाम गटात स्नायू व सांध्यांच्या किरकोळ दुखापतींचे प्रमाण थोडे अधिक आढळले (सुमारे १९% विरुद्ध १२%). मात्र हा धोका सर्वसाधारणपणे नियंत्रित करता येण्याजोगा आहे. योग्य मार्गदर्शनाखाली आणि हळूहळू व्यायामाची तीव्रता वाढवल्यास अशा दुखापती टाळता येऊ शकतात.

तुमच्यासाठी महत्त्वाचे मुद्दे

- व्यायाम हा केवळ आरोग्यासाठी चांगला नाही, तर कर्करोगानंतरच्या उपचारांचा महत्त्वाचा भाग ठरू शकतो.

- जलद चालणे इतके साधे कार्यही पुरेसे ठरू शकते; महागडी साधने किंवा जिमची गरज नाही.

- नियमितता सर्वात महत्त्वाची — आठवड्यातून ३–४ वेळा, दीर्घकाळ सातत्याने.

- कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, विशेषतः नुकतीच शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपी झाली असल्यास.

- हा अभ्यास मुख्यतः मोठ्या आतड्याच्या कर्करोगाच्या रुग्णांवर करण्यात आला असला, तरी सक्रिय राहण्याचे फायदे सर्वांसाठीच महत्त्वाचे आहेत.

मूळ संशोधन (संदर्भ)

Courneya KS, et al. Structured Exercise after Adjuvant Chemotherapy for Colon Cancer. N Engl J Med 2025;393:13-25. लिंक: https://www.nejm.org/doi/full/10.1056/NEJMoa2502760 



- Oncologist in Pune | Cancer Specialist | Dr. Chetan Deshmukh
Prev Explore