Pancreatic Cancer


Pancreatic Cancer

काही दिवसांपूर्वी अनेक समाजमाध्यमांवर एक चित्रफीत (व्हिडिओ) फिरत होती. स्वादुपिंडाच्या कर्करोगाविरुद्ध (कॅन्सरविरुद्ध) उपयुक्त ठरू शकणाऱ्या औषधाचे निकाल घोषित केले जात होते आणि उपस्थित कॅन्सरतज्ञ उभे राहून टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करत होते. कॅन्सरतज्ञ कोणत्याही औषधाचं असं स्वागत सहसा करत नाहीत. अनेक सभा-परिषदांमध्ये औषधांवर साधक बाधक चर्चा होते, औषधाची पार्श्वभूमी, विज्ञानाची आणि सांख्यिकीशास्त्राची चिरफाड केली जाते. ‘हं, ठीक आहे, बघू या कसं काम करतंय’ असा बहुतेकांचा सूर असतो. आज प्रकाशित झालं उद्या लगेच वापरात आणलं असं होत नाही. मग या औषधाबद्दल इतका उत्साह का?

यासाठी थोडी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल.

स्वादुपिंड आपल्या पोटात जठराच्या मागे आणि खाली असलेला माश्याच्या आकाराचा एक महत्वाचा अवयव. अन्नपचनासाठी आवश्यक पाचकरस आणि रक्तातली साखरेची पातळी कमी करणारं इन्सुलिन नावाचं संप्रेरक (हॉर्मोन) तयार करणं ही त्याची मुख्य कामं. माश्याच्या आकाराचा म्हणजे त्याला एक डोकं, धड आणि शेपूट असतं. डोक्याच्या बाजूचा भाग अन्ननलिकेत पाचकरस मिसळतो आणि इन्सुलिन रक्ताद्वारे सर्वत्र पाठवलं जातं.

स्वादुपिंडाचा कॅन्सर दुर्धर मानला जातो. उपचार किचकट, त्रासदायक आणि बऱ्याचदा अपेक्षेइतके यशस्वी होत नाहीत. ह्याची अनेक कारणं आहेत.

स्वादुपिंड हा अवयव म्हणायला पोटात, पण बराच आत, म्हणजे पाठीच्या थोडाच पुढे असतो, एरवी हाताने चाचपून लागत नाही. लहानशी गाठ असेल तर ती सोनोग्राफीतही दिसत नाही, हाताला लागणं तर लांबच राहिलं. या छोट्या गाठी वाढत जातात आणि मोठ्या झाल्यावरच लक्षात येतात.

स्वादुपिंडाजवळ महत्वाच्या रक्तवाहिन्या असतात. गाठ थोडीशी मोठी जरी झाली तरी या रक्तवाहिन्यांना चिकटते किंवा विळखा घालते आणि शस्त्रक्रिया (ऑपरेशन) अवघड होऊन बसते. स्वादुपिंडाचं डोकं, अन्ननलिका आणि पित्तवाहिनी अगदी जवळ असतात. डोक्याच्या भागातली लहानशी गाठही पित्तवाहिनी चेपून टाकते आणि रुग्णाला कावीळ होते. आधी ही कावीळ निस्तरावी लागते, मग बाकीचे उपचार. त्यातून होणारी गुंतागुंत वेगळीच.

स्वादुपिंडाच्या धड आणि शेपटाच्या भागातल्या गाठींची वेगळीच अडचण असते. यात कावीळ होत नाही, फक्त पाठीला रग लागते. मणक्याचे एक्स-रे, पाठीचा एम.आर.आय, फिजिओथेरपी, योगासनं असे सगळे प्रकार करून पाहिले जातात पण स्वादुपिंडाकडे लक्षच जात नाही आणि जेव्हा जातं तेव्हा गाठ इतरत्र पसरलेली असते. काही गाठी तर पेट स्कॅन मध्ये देखील दिसून येत नाहीत. फक्त पोटाचा सीटी स्कॅन केला तरच गाठ दिसते. 

या विचित्र परिस्थितीमुळे स्वादुपिंडाचा कॅन्सर बऱ्याचदा वाढलेल्या अवस्थेत आढळतो. शस्त्रक्रिया किंवा रेडिओथेरपी संभवत नाही म्हणून किमोथेरपीचा विचार होतो. इथं दुसरीच समस्या आहे. स्वादुपिंडाचा कॅन्सर किमोथेरपीला फारसा दाद न देणारा आहे. अगदी बाबा आदमच्या जमान्यातली गोष्ट नाही, सन २००० पर्यंत स्वादुपिंडाच्या कॅन्सरसाठी परिणामकारक किमोथेरपीच नव्हती. सन २००१-०२ साली जेमसिटाबीन नावाच्या औषधानं थोडीशी आशा दाखवली, पण त्यानं आयुर्मान किती वाढलं, तर काही आठवडे ! तब्बल २ दशकानंतरही जेमसिटाबीनला सक्षम पर्याय सापडलेला नाही आणि त्याच्या जोडीला आयुर्मान वाढवणारं चांगलं औषध मिळालेलं नाही. लक्ष्यवेधी(टार्गेटेड) उपचार लागू पडत नाहीत कारण सुयोग्य लक्ष्यच सापडलेलं नाही. सर्वांची लाडकी इम्युनोथेरपीही इथे काही कामाची नाही.

अश्यावेळी K-Ras (उच्चार-के-रास) नावाच्या जनुकेबद्दल (Gene) काही माहिती मिळू लागली. कल्पना करा, स्वादुपिंडाच्या कॅन्सरची गाठ एक चारचाकी गाडी आहे, जिला एक गतिवर्धक (ॲक्सिलरेटर) आणि एक गतिरोधक (ब्रेक) आहे.  K-Ras जनुकेत अनैसर्गिक कायमस्वरूपी बदल(म्युटेशन) झाले तर गाडीचा गतिवर्धक दाबलेलाच राहतो आणि गाडी (म्हणजे कॅन्सरची गाठ) वेगात धावत (वाढत) राहते. इतके दिवस या जनुकीय बदलाला अटकाव करायची(म्हणजे गतिवर्धक मोकळा करायची) क्लुप्ती सापडत नव्हती, ती आता सापडलीय.

K-Ras मधल्या म्युटेशनविरुद्ध Daraxonrasib (उच्चार- डॅर-ऑक्सॉन-रासिब किंवा डारा-झोन-रासिब) नावाची गोळी Revolution medicines या कंपनीनं शोधलीय. याचाच शोधप्रकल्प प्रकाशित होताना उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. या गोळीमुळे वाढलेल्या/पसरलेल्या (Advanced/Metastatic) स्वादुपिंडाच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांचं आयुर्मान ६ महिन्यांपासून १३.2 महिन्यांपर्यंत वाढलेलं दिसून आलं. अर्थात या गोळी चे काही सहपरिणाम/दुष्परिणाम (Side effects) आहेतच. अंगावर पुरळ उठणे, जुलाब होणे, तोंड येणे आणि मळमळ-उलट्या होणे असे काही परिणाम होतात पण त्यावर उपचार करणं सहज शक्य आहे.

काही लोक याला नाकं मुरडतील- आयुष्य वाढलं किती तर ६-७ महिने म्हणे ! ह्यात काय विशेष? बरा तर नाही न होऊ शकणार?- पण काही आठवड्यांपासून काही महिन्यांची प्रगती आश्वासक आणि काहीशी सुखावणारीही आहे. दुसरं म्हणजे या संशोधनातून या दुर्धर कॅन्सरमधला कच्चा दुवा तर सापडला! जसं शास्त्र प्रगती करेल तशी उपचारात सुधारणा होतच राहील. राईट बंधूंनी तयार केलेल्या पहिल्या विमानाची भरारी काही सेकंदांची होती, पण माणसाला आकाशात पक्ष्याप्रमाणे उडता येईल अशी आशा या भरारीनं दाखवली होती. जसं शास्त्र प्रगत होत गेलं तशी ही भरारी मोठी होत गेली. आज आपण सलग १८-२० तासांचा विमानप्रवास करतोच की!

डॅरॉक्सॉनरासिबचं स्वागत करताना हाच विचार लोकांनी केला.

हे औषध कंपनीनं नुकतंच विक्रीसाठी उपलब्ध केलंय- अमेरिकेत (भारतात अजून तरी नाही). त्याची किंमत सर्वसामान्य भारतीयांना तर सोडाच, सर्वसामान्य अमेरिकन नागरीकांनाही परवडणारी नाही.(महिन्याचा खर्च अंदाजे 3०,००० डॉलर=अंदाजे 3० लाख रुपये). पण या किमती बदलत राहतात, कालपरत्वे कमी होतात हे आपण पाहतोच. आणि याच्या सुधारीत आवृत्तींवरही काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ‘दिल्ली दूर असली’ तरी तिथे पोहोचण्याचा मार्ग खुला होतोय, हीच मोठी आशादायक गोष्ट आहे.



- Oncologist in Pune | Cancer Specialist | Dr. Chetan Deshmukh
Prev Explore