BREAST CANCER QUESTIONS

BREAST CANCER QUESTIONS

ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यावर त्या स्त्रीचे घाबरून किंवा गांगरून जाणे स्वभाविक आहे. पण अशा वेळी तिच्या बरोबरच्या व्यक्तिने किंवा एखाद्या नातेवाईकाने डॉक्टरांशी पुढील उपचारांबद्दल सविस्तर चर्चा करणे आवश्यक असते. बहुतेक रुग्णांचे नातेवाईक वैद्यकीय पेशाशी संबंधित नसतात, त्यामुळे डॉक्टरांशी काय बोलावं हा प्रश्न त्यांना पडतो. उपचार सुरू होण्याआधी उपचारांची तत्वे काय आहेत, कशा पद्धतीनं उपचार होतात, प्रत्येक उपचाराचा फायदा - तोटा काय याची पूर्वकल्पना असेल तर उपचार घेणं सोपे होते. खाली लिहिलेले प्रश्न रुग्णांनी विचारून समजावून घ्यावेत. (हे प्रश्न ब्रेस्ट कॅन्सरशी संबंधित असले तरी सर्वसाधारणपणे हे कोणत्याही कॅन्सरसाठी उपयोगी ठरू शकतात). १.ब्रेस्ट कॅन्सरची स्टेज (अवस्था) कोणती ? कोणत्याही कॅन्सरच्या स्टेजप्रमाणे त्याचे उपचार ठरतात. तसंच उपचारांचं यशापयश हे स्टेजवरच अवलंबून असते. काही वेळा प्रत्यक्ष रुग्णाला आजाराबद्दल किंवा त्याच्या स्टेजबद्दल संपूर्ण माहिती देण्याची नातेवाईकांची इच्छा नसते. (खरंतर आजार काय आहे हे रुग्णाला कधी ना कधी समजणार असतेच) त्यामुळे आजाराच्या स्टेजची माहिती ही कुटुंबातल्या किमान एखाद्या व्यक्तिला तरी असणे आवश्यक आहे.
२. या स्टेजसाठी योग्य उपचार कोणते ( ऑपरेशन / शस्त्रक्रिया, किमोथेरपी अथवा रेडिएशन थेरपी) ? कॅन्सर लहान किंवा लवकरच्या अवस्थेतला असेल तर शस्त्रक्रिया हा उपचार योग्य ठरतो. हेच जर गाठ थोडी मोठी असेल तर आधी किमोथेरपी देऊन गाठ छोटी करावी लागते. हाडांमध्ये/मेंदूत कॅन्सरची लागण झाली असेल तर आधी रेडिएशनचे उपचार घ्यावे लागतात.
३. उपचारांचा क्रम कोणता ? उपचारांना लागणारा वेळ किती ? बहुतेक वेळा आधी ऑपरेशन, नंतर किमोथेरपी आणि गरज असल्यास रेडियोथेरपी असा क्रम असतो. गाठ मोठी असल्यास आधी किमोथेरपी, नंतर ऑपरेशन, मग पुन्हा किमोथेरपी आणि रेडियोथेरपी असा क्रम असू शकतो. यात काही उपचार ठराविक वेळेप्रमाणेच घ्यावे लागतात याची माहिती करून घ्यावी. हे सर्व उपचार बराच काळ चालणारे असू शकतात. उदा: किमोथेरपीसाठी ४-५ महिने लागतात, रेडिएशन थेरपी ५ आठवडे दिली जाते. ऑपरेशननंतर रेडियोथेरपी घ्यायची असल्यास ती ६ महिन्याच्या आतच घेणे इष्ट असते. ऑपरेशननंतर जखम भरल्याबरोबर किमोथेरपी सुरू करता येते, महिना-दोन महिने थांबायची गरज नसते.
४. उपचारांचे साईड-इफेक्ट्स कोणते ? साईड इफेक्ट्स फक्त किमोथेरपीलाच असतात हा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. शस्त्रक्रियेत काही गुंतागुंत होऊ शकते, जखमेत पू होणे, जखम लवकर बरी न होणे, जखम पुन्हा उघडणे या सारख्या तक्रारी ऑपरेशननंतर उद्भवू शकतात. रेडिएशन थेरपीमुळे त्वचेवर लालसर चटटे येणे, खरचटल्यासारख्या जखमा होणे आणि त्वचा काळवंडणे या सारखे त्रास होऊ शकतात. किमोथेरपीमुळे मळमळ होणे, उलट्या होणे, रक्तपेशी कमी होणे आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊन ताप येणे, अशक्तपणा जाणवणे, केस गळणे यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात.
५. उपचारांदरम्यान खाण्यापिण्याची पथ्ये काय असतील ? बहुतेक उपचारांमध्ये खाण्यापिण्याची विशेष अशी पथ्ये नसतात. रुग्णांना असलेल्या बाकीच्या आजारांची (मधुमेह, हृदयविकार इ) पथ्ये मात्र सुरूच ठेवावीत. कॅन्सरच्या आणि त्या त्या आजारांच्या तज्ञांना दोन्ही बाजूच्या उपचारांची संपूर्ण कल्पना द्यावी.
६. उपचारांना खर्च किती येऊ शकतो ? कॅन्सरचे बहुतेक उपचार खर्चिक असतात, त्यामुळे त्यातील प्रकार निवडताना डॉक्टरांशी आधी चर्चा करूनच त्यासंबंधीचे निर्णय घ्यावेत. खासगी किंवा सरकारी योजनेद्वारे मदत घेता येते, त्याबद्दलच्या कागदपत्रांबाबत त्या विभागातून माहिती मिळू शकते.

- Oncologist in Pune | Cancer Specialist | Dr. Chetan Deshmukh





« Prev Next »