ब्रेस्ट कॅन्सर (म्हणजे स्तनांचा कर्करोग) हा जगभरातील स्त्रियांमधला सर्वात जास्त आढळणारा कॅन्सर आहे. भारतात एकूणात गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचं (सर्व्हायकल कॅन्सर) प्रमाण जरी जास्त असलं तरी ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण भारतातही वाढत चाललं आहे ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. मोद्या शहरांमध्ये (मुंबई, दिल्ली, बेंगळुरू इ.) ब्रेस्ट कॅन्सर हा क्रमांक एकचा कॅन्सर बनला आहे. साधारण दर १ लाख स्त्रियांमध्ये ३०- ३५ स्त्रिया इतकं ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण आहे. पाश्चात्य देशांमध्ये हेच प्रमाण जास्त आहे हे खरं पण भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचं आढळून आले आहे. आपल्यासाठी अजून एक चिंतेची गोष्ट म्हणजे भारतातील स्त्रिया या उशीराच्या अवस्थेत (स्टेज) वैद्यकीय सल्ल्यासाठी येतात. अमेरिकेसारख्या देशात ८०% स्त्रिया या १ल्या–२ऱ्या अवस्थेतच वैद्यकीय सल्ला घेऊन पूर्ण बऱ्या होतात. भारतातल्या ६०% स्त्रिया या आजार ३ ऱ्या किंवा ४थ्या अवस्थेत डॉक्टरांकडे येतात.
ब्रेस्ट कॅन्सरची कारणे कोणती ?
१. वाढतं वयः जसं स्त्रीचं वय वाढत जातं तसा तिला ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका वाढत जातो. त्यामुळे रजोनिवृत्तीनंतर स्तनात उद्भवलेल्या कोणत्याही गाठीकडे दुर्लक्ष करू नये, ती गाठ कॅन्सरची असण्याची शक्यता जास्त आहे.
२. बदलती जीवनशैली: आजच्या जगातल्या बदलेल्या आहारच्या कल्पना (अतिप्रमाणात मांसाहार, फास्टफूड, जंक फूड, खाण्यातले अपायकारक रंग/इतर भेसळ), ताण, कमी किंवा मुलेच होऊ न देणे, भेसळयुक्त भाज्या/फळं या सर्व प्रकारांचा ब्रेस्ट कॅन्सर वाढवण्याला हातभार लागतो.
३. अनुवांशिकता: ज्या स्त्रीच्या सख्ख्या नात्यांमधल्या स्त्रियांना कॅन्सर आणि विशेषकरून ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे, अश्या स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता इतर स्त्रियांपेक्षा निश्चितच जास्त असते.
४. लठ्ठपणा व अतिचरबी : शरीरातल्या चरबीचं प्रमाण वाढायला लागलं की या चरबीतून संप्रेरकं (हॉर्मोन्स) तयार होऊ लागतात. ही हॉर्मोन्स- विशेषत: इस्ट्रोजन - स्तनांच्या कर्करोगाला कारणीभूत ठरतात.
५. मासिक पाळी लवकर सुरू होणे व रजोनिवृत्ती उशीरा होणे, मुले न होणे, हॉर्मोन्सच्या गोळ्या घेणे यामुळे हॉर्मोनविषयीचा समतोल बिघडून ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
धूम्रपान ( स्मोकिंग): धूम्रपानामुळे सर्वच कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. ब्रेस्ट कॅन्सर होण्याला धूम्रपान प्रत्यक्ष नाही तरी अप्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरते. महत्वाची गोष्ट म्हणजे सिगारेटचा धूर अगदी कमी प्रमाणातसुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढवू शकतो. त्यामुळे एखादी स्त्री जरी स्वतः सिगारेट ओढत नसली तरी तिच्या आजूबाजूच्या व्यक्ती जर सिगारेट ओढत असतील तर त्यामुळे स्त्रीला कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
- Oncologist in Pune | Cancer Specialist | Dr. Chetan Deshmukh