ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणेः
१. स्तनातली गाठः स्तनात न दुखणारी (किंवा दुखणारी सुद्धा) गाठ है ब्रेस्ट कॅन्सरचं सर्वात महत्वाचं आणि सहज ओळखू येण्यासारखं लक्षण आहे. पण याबाबत इतके गैरसमज आहेत की या महत्वाच्या लक्षणाकडे बऱ्याचदा दुर्लक्षच केलं जातं. 'गाठ दुखत नाही ना, मग असू दे, होईल बरी' असा विचार केला जातो. किंवा 'गाठ दुखत आहे ना, मग ती कॅन्सरची असूच शकत नाही ( वास्तविक असा कोणताही नियम अस्तित्वात नाही). दुसरं म्हणजे ही कॅन्सरची असण्याची शक्यताच मुळी गृहित धरली जात नाही. ‘दुधाची गाठ असेल' ही भाबडी समजूत अगदी साठीच्या स्त्रियांमध्येही आढळते. इथे आवर्जून सांगावेसे वाटते की दुधाची गाठ (ज्याचं शास्त्रीय नाव गॅलॅक्टोसिल आहे) ही अपत्याला स्तनपान सुरू असताना(किंवा त्याच्या आसपासच्या काळात) होऊ शकते. स्तनपान थांबवल्यानंतर दुधाची गाठ होण्याची शक्यता खूप कमी असते. स्तनातल्या गाठीची तक्रार घेऊन आलेल्या स्त्रीचं वय हा रोगनिदानातला एक महत्वाचा घटक आहे. नुकत्याच वयात आलेल्या मुलीच्या स्तनात अशा गाठी बऱ्याच वेळा आढळतात, ज्या कॅन्सरच्या असण्याची शक्यता खूप कमी असते, या हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे होऊ शकतात. अशाच गाठी २०-४५ वयाच्या स्त्रियांनासुद्धा जाणवू शकतात. त्यात कॅन्सरची गाठ कोणती आणि साधी गाठ कोणती हे फक्त तज्ञ डॉक्टरच ठरवू शकतात. पण पन्नाशीनंतर किंवा रजोनिवृत्ती (मेनोपॉझ) नंतर जर अशी गाठ जाणवली तर ती कॅन्सरची असण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणूनच तिच्याकडे दुर्लक्ष करू नये.
स्तनातल्या गाठीबरोबरच काही स्त्रियांना काखेत गाठ किंवा गाठी जाणवू शकतात. कॅन्सरची लागण काखेतल्या गाठींपर्यंत गेल्याचं हे लक्षण आहे. याचबरोबर स्तनाग्र (निपल ) मधून रक्तस्त्राव, स्तनाग्र आत ओढले जाणे, स्तनाच्या त्वचेवर कठीणपणा, जखम किंवा सूज येणे किंवा स्तनाच्या आकारात बदल होणे ही लक्षणे सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरची असू शकतात. स्तनातल्या कॅन्सरची गाठ जर अतिप्रमाणात वाढली तर क्वचित ती स्तनातून बाहेर येऊ शकते. कॅन्सर जर शरीराच्या इतर भागात पसरला तर ज्या ठिकाणी कॅन्सरची लागण झाली आहे त्याप्रमाणे लक्षने बदलू शकतात. हाडांमध्ये पसरलेल्या कॅन्सरमुळे कंबरदुखी / पाठदुखी सुरू होते, फुफ्फुसांमध्ये कॅन्सर पसरल्याने सतत खोकला येणे, दम लागणे किंवा खोकल्यातून रक्त पडणे असे त्रास होऊ शकतात. पोटात लिव्हरमध्ये पसरलेल्या कॅन्सरमुळे कावीळ होऊ शकते. मेंदूमध्ये कॅन्सरच्या गाठी झाल्यास डोके दुखणे, उलट्या होणे, फिट्स (झटके) येणे, हात किंवा पाय लुळा पडणे असे त्रास उद्भवतात.
- Oncologist in Pune | Cancer Specialist | Dr. Chetan Deshmukh